| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघ सध्या आशिया चषकामध्ये व्यस्त आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयी घोडदौड करत जेतेपदाकडे वाटचाल करत आहे. आशिया चषकानंतर लगेचच भारतीय संघ पुन्हा एकदा पांढऱ्या जर्सी घालून कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार असून लवकरच संघ जाहीर केला जाईल. दरम्यान, भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतून एक मजबूत खेळाडू वगळला जाऊ शकतो. अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नसली तरी, रिषभ पंत या मालिकेचा भाग नसल्याची माहिती मिळत आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल, जी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. मालिकेचा पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली असून भारतीय संघाचीही लवकरच घोषणा होण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिषभ पंत या मालिकेतून बाहेर पडू शकतो. अहवालात असे म्हटले आहे की, बीसीसीआय निवड समितीची 24 सप्टेंबर रोजी बैठक होईल, त्यानंतर संघाची घोषणा केली जाईल.







