| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नांदगावमध्ये सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातील उपजिविका विकास व सामाजिक न्याय अंतर्गत वरळी-मुंबईच्या जन विकास सामाजिक संस्था व ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव यांच्यावतीने प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या 40 मच्छिमार महिलांना मच्छीमारी जाळी विणण्याचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. नांदगावच्या कोळीवाड्यातील सभागृहात दि. 17 ते 22 सप्टेंबर या सहा दिवसांत हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी महिलांना संस्थेच्या सदस्या रचना कवळे यांच्या माध्यमातून जाळी विणण्याचे कौशल्य शिकवण्यात आले. दरम्यान, या प्रशिक्षण केंद्राला नांदगावच्या सरपंच सेजल घुमकर, उपसरपंच मेघा मापगावकर, ग्रामसेवक प्रमोद म्हात्रे, माजी उपसरपंच अस्लमभाई हलडे, सदस्य नितेश रावजी, विक्रांत कुबल, विजयश्री रावजी, अमिषा पाटील, मंजुम घोले, उदय थळे, विशाल पाटील, जितेंद्र दिवेकर व वैशाली रणदिवे आदींनी भेट दिली.





