लोहारे व देवळे प्रभागात 43 ग्रामसंघात 2 कोटी 10 लाख कर्जवाटप
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय महिला बचतगटांना कर्जवाटप करण्यात येऊन महिला सक्षमीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे. महिलांची संख्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पुरूषांच्या तुलनेमध्ये अधिक असून, पुरूषांची मतदार संख्या ही शहरी भागात रोजगारानिमित्त गेल्याने कायमच घटलेली दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील लोहारे आणि देवळे प्रभागांतील 43 ग्रामपंचायतींतर्गत 43 ग्रामसंघांमध्ये 528 महिला बचतगटांसाठी 2 कोटी 10 लाखांचे बँक कर्जवाटप झाले असून, महिलांमध्ये उद्यमशीलतेसोबतच समाजभान निर्माण होण्याची उमेद वाढल्याचे दिसून येत आहे.
केंद्रसरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरूवात 2011 मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान उमेद या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यात या ‘उमेद’ स्वतंत्र संस्थेंतर्गत काम उशिरा सुरू झाले. मात्र, पूर्वीपासून सुरू असलेल्या महिला बचतगट, महिला स्वयंसहायता गटांची रेलचेल या उमेदमुळे अधिकच भरारी घेऊ शकली आहे. या सरकारी उमेद संस्थेमार्फत महिला बचत गटांना आवश्यक तेवढे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली असून, महिलांच्या कार्यकर्तृत्वाला उभारी तसेच विविध प्रकारच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी उमेद पोलादपूर तालुक्यातील महिला बचतगटांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे जिल्हा परिषद प्रभागांतर्गत 23 ग्रामसंघांमध्ये एकूण 262 महिला स्वयंसहायता गट तसेच महिला बचतगट आहेत. या बचतगटांमध्ये 72 लाख खेळते भांडवल आहे. समुदायनिधी 1 कोटी 52 लाख 40 हजारांचा असून, जोखीम प्रवणता निधी 2 लाख 25 हजार रूपये आहे. बीज भांडवल 12 लाख 51 हजार रूपये आहे. खाद्यपदार्थ निर्मितीचा प्रोड्युसर ग्रुप अस्तित्वात असून, त्यासाठी 50 हजारांचा निधी आहे. ग्रामसंघ व्यवस्थापन निधी 11 लाख 25 हजार रूपयांचा आहे. लोहारे प्रभागसंघ व्यवस्थापन निधी 2 लाख रूपयांचा आहे.
पोलादपूर तालुक्यातील देवळे जिल्हा परिषद प्रभागांतर्गत 20 ग्रामसंघांमध्ये एकूण 266 महिला स्वयंसहायता गट तसेच महिला बचतगट आहेत. या बचतगटांमध्ये 75 लाख 30 हजार रूपये खेळते भांडवल आहे. समुदायनिधी 1 कोटी 44 लाखांचा असून, जोखीम प्रवणता निधी 90 हजार रूपये आहे. बीज भांडवल 19 लाख 90 हजार रूपये आहे. कडधान्य व खाद्यपदार्थ निर्मितीचा प्रोड्युसर ग्रुप अस्तित्वात असून, त्यासाठी 70 हजारांचा निधी आहे. शेतीसाठी अवजार निधी 10 लाख रूपये अशी अर्थरचना केली आहे.
देवळे आणि लोहारे या प्रभागसंघांमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये 528 महिला बचतगटांसाठी 2 कोटी 10 लाखांचे बँक कर्जवाटप करण्यात आले असल्याने यंदापासून दोन्ही प्रभागसंघांमध्ये महिला बचतगटांमध्ये नोकरी रोजगारांनिमित्त शहराकडे जाणाऱ्या पुरूषांसाठीदेखील रोजगाराची संधी निर्माण करून गावातच थांबविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट आणि एमएसआरएलएमच्या ममता भुवड यांनी पोलादपूर तालुक्यातील 528 महिला बचतगटातील सर्व प्रमुख तसेच सदस्य महिलांसोबत चांगल्याप्रकारे समन्वय साधून महिला सदस्यांना तसेच स्वयंसहायता महिला बचतगटांना आर्थिक बाजूचा योग्य वापर करून उत्पनाचे साधन निर्माण करण्यासाठी मार्गदर्शनदेखील केले आहे.
देवळे प्रभागसंघांतर्गत उमेदचा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आता लोहारे प्रभाग संघाच्या महिला बचतगटांचे तसेच ग्रामसंघांचे उमेद कार्यक्रमाचे नजिकच्या काळात आयोजन केले जाणार आहे. कार्यक्रम कितीही यशस्वी झाले तरी नोकरीनिमित्त शहराकडे गेलेल्या पुरूषांविना संसाराचे चाक ओढण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील महिला बचतगटाच्या सदस्य महिला आता सज्जच नव्हे तर पुरूषांनाही ‘खेडयाकडे चला’ महात्मा गांधीजींचा मंत्र अमलात आणण्यास भाग पाडण्यास सुसज्ज झाल्याचे समाधान दिसून येत आहे.







