| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील आठ प्रतिभावान युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ तिसऱ्या आशियाई ज्युनियर पिंच्याक सिलॅट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 24 सप्टेंबर 2025 रोजी श्रीनगरला रवाना झाला. भारतासाठी ही स्पर्धा ज्युनियर वयोगटात प्रथमच आयोजित केली जात असून, ती 25 ते 30 सप्टेंबरदरम्यान शेर-ए-काश्मीर इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, कझाकस्तान, फिलीपीन्स, उझबेकिस्तान, थायलंड, मलेशिया आणि व्हिएतनाम अशा एकूण 11 देशांतील 300 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ खेळाडूंची निवड झाल्याने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन इंडिया क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. हे खेळाडू विविध 5 प्रकारांमध्ये आपली कला सादर करणार आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्सुक असून, देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्यांना आशा आहे.
तसेच आज 25 सप्टेंबर रोजी श्रीनगर येथे तिसऱ्या ज्युनियर एशियन पिंच्याक सिलॅट स्पर्धेच्या लॉन्चिंग अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेमुळे आशियातील सर्वात रोमांचक मार्शल आर्ट्स इव्हेंटसाठी वातावरण निर्मिती झाली आहे.
सोहळ्याचे अध्यक्षस्थान जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य क्रीडा अधिकारी अनिसा नबी आणि जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषदेच्या सचिव नुझहत गुल यांनी भूषवले. या प्रसंगी त्यांनी आगामी स्पर्धेच्या ट्रॉफीजचेही अनावरण केले. याप्रसंगी भारतीय पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, विभागीय क्रीडा अधिकारी जावीद उर रेहमान, भारताचे मुख्य प्रशिक्षक इरफान अझीझ, आणि मोहम्मद इक्बाल हे देखील उपस्थित होते.







