| खोपोली | प्रतिनिधी |
ज्ञान तृष्णा गुरौनिष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुण पंचकम् या संस्कृत गुरूमंत्रानुसार ज्ञानाची तहान, गुरूवरची निष्ठा, सतत काहीना काही नवीन शिकण्याची तत्परता, एकाग्रता आणि महत्वकांक्षा हे पाच गुण विद्यार्थ्यांमध्ये असतील तर चांगला विद्यार्थी घडू शकतो. त्यामुळे वकील होण्याआधी चांगला माणूस असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲड. वर्षा घारे यांनी केले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ विधी महाविद्यालयरत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बी.एल.पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या की, विधी महाविद्यालय सुरू झाल्यापासून खुप आडचणी येत आहेत. परंतु, अशा परिस्थितही संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबूबकर जळगावकर, कार्यवाह किशोर पाटील व अध्यक्ष नरेंद्र शहा कायम आपल्या सोबत असतीलच, असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, देवन्हावे छत्रपती विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे, ॲड. तनिष्का देशमुख व ॲड. मेघना पोळेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन अध्यक्ष नरेंद्र शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षी विविध स्पर्धांमधील गुणवंत स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नरेंद्र शहा यांनी म्हटले की, संस्थेच्या संचालकांनी पाठपुरावा केल्यानंतर विधी महाविद्यालयाला परवानगी मिळाली. त्यावेळी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर पूर्ण सुविधा देण्यासाठी कमी पडलो यासंबंधी प्रामाणिकपणे सांगतो. परंतु, पुढील काळात विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कायम प्रयत्न करेल, असे अश्वासन देत त्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना संचालक भास्कर लांडगे यांनी सांगितले की, विधी महाविद्यालयात प्रबल इच्छा शक्तीच्या बळावर विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. आपणही नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा, संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल, असा शब्द त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत देशमुख तर आभार सचिन घरत यांनी मानले.







