। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. आज, बुधवार, दि. 1 रोजी सिलेंडर महागला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो ग्रॅमच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 15 रुपयांपर्यंत वाढवले आहेत. मात्र, 14 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सणासुदीत व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असले तरी, घरगुती गॅसचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत. याचा अर्थ सामान्य ग्राहकांना दिलासा आहे. दुसरीकडे, उज्ज्वला योजनेशी जोडलेल्या कोट्यवधी महिलांना सरकारने मोफत सिलिंडर आणि नवीन गॅस कनेक्शनचे गिफ्ट दिले आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने राज्यातील 1.85 कोटी महिलांना दिवाळीपूर्वी मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनेही नवरात्रीच्या मुहूर्तावर 25 लाख नवीन प्रधानमंत्री उज्ज्वला कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशभरात उज्ज्वला गॅस कनेक्शनची संख्या वाढून 10 कोटी 60 लाख होईल.
एलपीजी सिलेंडरचे नवे दर खालीलप्रमाणे आहेत.
19 किलो ग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती
दिल्लीमध्ये, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1595.50 रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये 1580 रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच 15.50 रुपयांनी वाढली आहे.
कोलकातामध्ये, सिलिंडरची किंमत आता 1700 रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये 1684 रुपये होती, म्हणजेच 16 रुपयांनी वाढली आहे.
मुंबईत त्याची किंमत सप्टेंबरमधील 1531.15 रुपयांवरून वाढ होऊन आता 1547 रुपये होईल.
चेन्नईमध्ये, सिलिंडरची किंमत आता 1754 रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये 1738 रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच 16 रुपयांनी वाढली आहे.






