। पनवेल । प्रतिनिधी ।
गुंतवणुकीवर पाच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिली आणि गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर झालेला नफा अशी रक्कम परत न करता 69 लाख सात हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच अनोळखी व्यक्तीं विरोधात सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुनम म्हात्रे ह्या सुकापुर येथे राहत असून, त्यांच्या पतीला टेलिग्राम ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्या ट्रेडिंगमध्ये पाच टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्यांना ग्रुपमध्ये लिंक पाठवून ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यास सांगण्यात आले. त्या दोघांनी त्यात गुंतवणूक करण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड केले आणि त्यात नोंदणी केली. त्यावेळी बनावट सर्टिफिकेट पाठवण्यात आले. त्यांनी एकूण 69 लाख 69 हजार रुपये भरले. जुलै 2025 मध्ये त्यांनी काही रक्कम काढून पाहिली असता ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्याने त्यांचा विश्वास बसला. 1 सप्टेंबर रोजी त्यांच्या ट्रेंडिंग अकाउंटला नफ्यासह 1 कोटी 88 लाख 73 हजार इतकी रक्कम दिसत होती. ती रक्कम काढण्याकरीत संपर्क केला असता 6 लाख 70 हजार रुपये व्हेरिफिकेशन डिपॉझिट भरावे लागेल असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी विनंती करूनही कोणतीही रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने म्हात्रे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







