रस्ता वाहून गेल्याने श्रमिकांची वाट बिकट
| नेरळ | प्रतिनिधी |
ब्रिटिश माथेरानमध्ये ज्या रस्त्याने सर्वप्रथम आले. तो शिवाजी ग्लॅडर रस्ता यावर्षीच्या पावसाने वाहून नेला आहे. माथेरानच्या डोंगरदरीत वसलेल्या खोंडा या आदिवासी गावाकडे माथेरानमधून जाणारी पायवाट ही मुसळधार पडणाऱ्या पावसात झालेल्या भूस्खलनामुळे लुप्त झाली. माथेरानमधून डोंगरदरीतून खाली उतरण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. यामुळे आता आदिवासी ग्रामस्थांपुढे उपजीविकेचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
माथेरान डोंगरातील खोंडा गावाकडे जाण्यासाठी माथेरानमधील छत्रपती शिवाजी महाराज लॅडर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दरीतून शिडी उतरून खाली जाणे व पुढे निसरडी पायवाट असा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील आदिवासी लोक आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी माथेरानमध्ये डोंगर चढून येतात. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसात खोंडा गावाकडे जाणारी दरी भागातील पायवाट ही मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे लुप्त झाली आहे. लोखंडी शिडीची संपूर्ण दुरवस्था होऊन रस्ता नष्ट झाला आहे. खोंडावासीयांना गावात जायला दुसरा मार्गच नाही. या जीवघेण्या प्रवासाची प्रशासन दखल घेणार का? असा प्रश्न खोंडा आदिवासी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
माथेरानमधील पर्यटन व्यवसायावर माथेरान डोंगरातील आदिवासी लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. अशावेळी या आदिवासी गावांमधील श्रमिकांसाठी शासनाने पाऊलवाटा मजबूत करण्याची गरज आहे.
जनार्दन पार्टे,
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते







