। पालघर । प्रतिनिधी ।
वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुदानित असलेल्या माध्यमिक आश्रमशाळेतील 9 वी व 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.8) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आश्रमशाळा परिसरात असलेल्या एका झाडाला कपडे वाळत घालण्यासाठी असलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मोखाडा तालुक्यातील मनोज सीताराम वड (वय 14, 9 वी, रा.दापटी), तर देविदास परशुराम नावले (वय 15, 10 वी, रा.बिबळपाडा, दापटी) अशी या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोन्ही विद्यार्थी या आश्रमशाळेतच इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे कारण निश्चित कळू शकलेले नाही. या घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही सुसाईट नोट मिळून आली नाही. मात्र एका आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत एक मोबाईल सापडला असून पोलिसांनी तो तपासाकरिता ताब्यात घेतला आहे.







