| नागपूर | प्रतिनिधी |
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळीच्या अन्नपदार्थांची विक्री वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांत विभागाने नागपूरसह परिसरात विविध ठिकाणी धाड टाकून तेल, पनीर, खवा आणि दही यांसारख्या अन्नपदार्थांचा तब्बल 57 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच अस्वच्छ व अनारोग्यदायी वातावरणात रसगुल्ला तयार करणाऱ्या दोन कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेंतर्गत ‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्नसुरक्षिततेचा’ या उपक्रमाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या मोहिमे दरम्यान एकूण 32 नमुने घेऊन सुमारे 28,837 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये खाद्यतेलाचे 18 नमुने, एकूण 33,278 किलो, किंमत 47,64,138, पनीर आणि खोवाचे 3 नमुने, एकूण 522 किलो, किंमत 1,26,980, दहीचे 3 नमुने, एकूण 6,184 किलो, किंमत 2,52,456, मिठाईचे 2 नमुने, एकूण 1,706 किलो, किंमत 2,72,960, अशा प्रकारे एकूण 57,98,217 रुपयांचा साठा जप्त करून नाशवंत व भेसळीचा संशय असलेले पदार्थ नष्ट करण्यात आले.







