नीरज, अनिरुद्ध यांची द्विशतकीय भागीदारी; महाराष्ट्राचा सौराष्ट्रवर दणदणित विजय
| नाशिक | प्रतिनिधी |
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.18) महाराष्ट्राने 10 गडी राखून सौराष्ट्रविरुद्ध दणदणीत विजय मिळविला. सलामीवीर नीरज जोशी (नाबाद 134 धावा) आणि अनिरुद्ध साबळे (नाबाद 74 धावा) यांच्या धुव्वाधार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने हा विजय मिळविला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्रविरुद्ध सौराष्ट्रचा सामना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरला. गुरुवारी (दि.16) सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा पहिला डाव डळमळीत राहिला. सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात आघाडी मिळालेली होती. असे असताना महाराष्ट्र संघाने उत्तम समन्वय व उत्कृष्ट खेळी करत सामन्यात विजय मिळविला. शुक्रवारी (दि.17) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना सौराष्ट्र संघाची 5 बाद 60 अशी धावफलकावरील स्थिती होती. या संघाकडे 129 धावांची आघाडी होती. शनिवारी (दि.18) तिसऱ्या दिवशी सकाळपासून महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवत सौराष्ट्रच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही व 70 धावांवर मौर्य घोघारीला बाद करत फलंदाजांवर दबाव आणला. नंतरच्या फलंदाजांनी मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाग्यराजसिंह चुडासमा 66 धावांवर झेलबाद झाल्याने सौराष्ट्रला सातवा झटका बसला. त्यांनतर क्रेन्स फुलेत्रा देखील बाद झाला. तीर्थराज जडेजाकडून संघाला मोठ्या अपेक्षा असताना, त्याला विशेष योगदान देता आले नाही. तो 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर चंद्रराज राठोडला बाद करताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सौराष्ट्र संघाला अवघ्या 138 धावांवर रोखले. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगर्गेकरने 4, शुभम मैडने 3, नीरज जोशीने 2 व सलामने 1 गडी बाद केले.
महाराष्ट्र संघापुढे विजयासाठी 207 धावांचे आव्हान असताना, सलामीचे फलंदाज नीरज जोशी आणि अनिरुद्ध साबळे यांनी सुरुवातीपासून लय धरताना तुफान फटकेबाजी केली. नीरजने नाबाद 134 धावांची बलाढ्य खेळी केली. त्याला अनिरुद्धने साथ देताना 74 धावांचे योगदान दिले. दोघांच्या मिळून 208 धावांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने 10 गडी राखून सामन्यात विजय मिळविला व चार दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी निर्णायक ठरला. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व इतर पदाधिकाऱ्यांनी विजयी महाराष्ट्र संघातील खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक निरंजन गोडबोले व इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.







