सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स
| मुंबई | प्रतिनिधी |
आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवट झाला आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात यजमान भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेला हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. आता या सामन्यानंतर उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. एकूण 4 संघात वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीत टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी धडक दिली आहे. उपांत्य फेरीतील सामन्यांना 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरुवात होणार आहे. सेमी फायनल राउंडचा थरार 29 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या दोन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसमोर इंग्लंडचं आव्हान
सेमी फायनलमधील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. हा सामना 29 ऑक्टोबरला गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघ साखळी फेरीनंतर पुन्हा आमनेसामने असणार आहेत. इंग्लंडने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या पराभवाची परतफेड करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवणार की इंग्लंड पुन्हा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला साखळी फेरीत पराभूत केलं होतं. भारताला साखळी फेरीत 330 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र उपांत्य फेरीत आर या पार अशी लढाई आहे. तसेच वू्मन्स टीम इंडियाकडे साखळी फेरीतील पराभवाचा हिशोब करण्याचीही संधी आहे. मात्र, भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना आव्हानात्मक असणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. आता उपांत्य फेरीत कोण कुणाला पराभूत करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
4 संघाचं साखळी फेरीतच पॅकअप
दरम्यान पाकिस्तान, बांगलादेश, सहयजमान श्रीलंका आणि न्यूझीलंड या 4 संघांचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. पाकिस्तान या स्पर्धेतील सर्वात अपयशी टीम ठरली. पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही.







