| दापोली | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने तीन चारचाकी वाहनांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मोटारमधून प्रवास करणारे दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. खेड तालुक्यातील वेरळ येथे गेली अनेक वर्षे महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा अपूर्ण अवस्थेत असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. महामार्गावरील या ठिकाणी यापूर्वीदेखील छोटे-मोठे अनेक अपघात झाले आहेत. तरीदेखील अद्याप महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जात नसल्याचे दिसून येत आहे. याच अपूर्ण कामाचा फटका पुन्हा एकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सोसावा लागला आहे.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा कंटेनर हा भोस्ते घाट उतरून आल्यानंतर वेरळ गावातील महामार्गावरील डायव्हर्शन येथे आला असता, सर्वप्रथम पुढे असलेल्या मोटारीला पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे या मोटार पुढे असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडकली. तसेच यावेळी समोरून येणाऱ्या पिकअपला कंटेनरने धडक दिली आणि मुंबईच्या दिशेने समोर निघालेल्या मोटारीवर उलटला. यामध्ये मोटारीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. सुदैवाने या मोटारीमधून प्रवास करणारे दोघेजण बचावले असले, तरी त्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघाताची माहिती मिळतात तत्काळ स्थानिक नागरिकांनी मोटारींमधील प्रवाशांना मदत केली. मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या मदतीने त्या जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली, तसेच महामार्गावर कंटेनरमधील रसायनयुक्त तेल सर्वत्र पसरले होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात खेड पोलिसासह, लोटे महामार्ग वाहतूक पोलिस यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली व वाहतूक सुरळीत केली, मात्र वारंवार या ठिकाणी होणारे अपघात हे महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत असल्याचे चित्र असून, हा महामार्ग नक्की पूर्ण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.






