| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारा पक्ष आहे. गोरगरींबाशी आपली नाळ जोडली गेली आहे. येथील शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित घटक जगला पाहिजे, यासाठी आपण काम करीत आहोत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणूका होणार आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता, एक दिलाने प्रत्येकाने या निवडणूकांमध्ये कामाला लागा. घरोघरी जाऊन पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक मतदारांना समजवावून सांगा. आगामी निवडणुकीत विजय हा आपलाच आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागधील शेतकरी भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, ॲड. सचिन जोशी, अशोक प्रधान, ॲड. परेश देशमुख, ॲड. निलम हजारे, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे आदी पदाधिकारी, तसेच वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, सदस्य उपस्थित होते.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, अलिबागसह रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगल्या पध्दतीने काम करीत असल्याचा आनंद आहे. स्मार्ट मीटर, भरमसाठ वीज बील, रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक प्रश्नांवर शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठविला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी कामगार पक्षच रस्त्यावर उतरू शकतो. हे अनेकवेळा वेगवेगळ्या लढ्यातून कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी गरीबांशी आहे. संघटना म्हणून जोमाने काम करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कामाला लागा. शहरी भागासह ग्रामीण भागातील वेगवेगळ्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकीतील ध्येय-धोरणे स्पष्ट केले जाणार आहेत. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही कामे चालू राहणार आहेत. निवडणूका जाहीर झाल्याशिवाय उमेदवार जाहीर केला जाणार नाही. मात्र, जनतेशी बांधीलकी असणारे, शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून काम करणारे उमेदवारच जाहीर केले जाणार आहेत, असे शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा -ॲड.मानसी म्हात्रे
गेली काही वर्षापासून नगरपरिषदेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट आहे. शहरासह तालुक्यांमधील गटार, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न सोडविण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गीदेखील लावण्यात आले आहेत. शेतकरी कामगार पक्ष जनसामान्यांसाठी उभा राहत आहे. हेच ध्येय ठेवून आगामी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. व्यापक स्वरुपात बैठक घेऊन काम केले जाणार आहे. अलिबाग शहरातील पुढील निवडणूक प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या विचारातून लढविली जाणार आहेत. आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची ताकद दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
शेकाप एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे -ॲड. गौतम पाटील
कोरोना काळात शेतकरी कामगार पक्षानेच काम केले. नऊ वर्षाने निवडणूकांना सोमारे जाताना याबाबतच आढावा घेणे आवश्यक आहे. विरोधकांनी काहीच काम केले नाही. रस्ते, पाणी देण्याचे काम आमदारांचे आहे, मात्र हे प्रश्न आजही कायम आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्षाने रस्ते, पाणी आदी प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा प्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत निवडून आला पाहिजे. त्या पध्दतीने प्रत्येकाने काम करायचे आहे. शेकाप जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राहिल या पध्दतीने काम करण्याकडे लक्ष द्या, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी केले.







