जिल्ह्यावर मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव; शेती, मासेमारी, पर्यटनाला फटका
| रायगड | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यावर दिसत आहे. वादाळाने जिल्ह्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी वर्गावर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे. तसेच, मासेमारी आणि जलवाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याने रायगड जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे.
सध्या देशात मोंथा चक्रीवादळाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे बंगाल्या उपसागरासह अरबी समुद्रात देखील त्याचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊसाने देखील प्रचंड प्रमाणात जोर धरला आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील तयार झालेल्या भातपीकाची अक्षरशः माती झाली आहे. मोठ्या कष्टाने वाढवलेल्या पिकाकडे पाहताना शेतकऱ्यांना रडू येत आहे. साचलेल्या पाण्यातून पीक जमा करुन शेतकरी घरात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खलाटीत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कोणत्या पिकाचे पंचनामे करायचे, असा प्रश्न पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पडू लागला आहे. जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तसेच, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाबरोबर, जोराचे वारे सुटणार असल्याने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार 417 मासेमारी नौका 23 ऑक्टोबरपासून विविध बंदरांमध्ये नांगरलेल्या स्थितीत आहे. या नौकांवरील लाखो कामगारांचा रोजगार 30 ऑक्टोबरपर्यंत बुडणार आहे. त्यात मच्छिमारांचे करोडोंचे नुकसान होणार आहे.
त्याचबरोबर वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांची देखील निराशा झाली आहे. दिवाळी हा पर्यटनाचा मोठा हंगाम मानला जातो. मुंबई, पुण्याचे लाखो पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. परंतु, दिवाळी संपताच पावसाने पर्यटकांची वाट अडवली. त्यातच जिल्ह्यातील जलवाहतूक बंद झाल्याने मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांना अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देताना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच, मुरूड तालुक्यातील जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना जाता आले नाही. त्यामुळे नोंदणीकृत हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, गाईड्स यांची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पुढे ही अशीच परिस्थिती कायम राहिली तर ऐन हंगामात पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवतील हे नक्की. त्यामुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार बांधव आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ उद्भवणार आहे. परिणामी रायगड जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच अडचणीत येत आहे.
70 टक्के शेतीचे नुकसान
कृषी विभागाने 2025च्या खरीप हंगामासाठी 81 हजार 335 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेमतेम 70 हजार क्षेत्रावरच भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या 23 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार 691 गावातील 5 हजार 642 शेतकऱ्यांचे 1 हजार 698 हेक्टर क्षेत्रावरील भातपीकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार नुकसान 70 टक्केच्या आसपास आहे.






