दुर्गंधीमुळे मानवी आरोग्य धोक्यात; भातशेती संकटात असल्याची भीती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-वावे मार्गावरील वेलवली खानावनजीक पुष्पाई सीफूड कंपनी आहे. या कंपनीतील दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीतील सांडपाणी शेतामध्ये सोडल्याने भातशेती देखील नष्ट होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी सकाळी वेलवली येथील ग्रामस्थांनी या दुर्गंधीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कंपनीतील चालकांना घेराव घालत मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
अलिबाग तालुक्यात खानावपासून घोटवडे परिसरात वेगवेगळे प्रकल्प येऊ घातले आहेत. वेगवेगळे लहान मोठे प्रकल्पातील सांडपाणी, दुर्गंधीचे नियोजन केले जात नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वेळवली-खानावनजीक गेल्या अनेक महिन्यांपासून पुष्पाई सीफूड कंपनी आहे. भाड्याच्या जागेत हा प्रकल्प सुरु आहे. समुद्रातील मासळी कंपनीत आणून ती अन्य राज्यात, देश, विदेशात अवजड वाहनांद्वारे पाठविण्याचे काम या कंपनीमार्फत केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य रस्त्याच्या कडेलाच हा प्रकल्प आहे. त्यामुळे येता-जाता नागरिकांना दुर्गंधीचा त्रास कायमच होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
वेलवली येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सीफूडच्या कंपनीत जाऊन तेथील संस्था चालकाला घेराव घातला. दुर्गंधीबाबत जाब विचारण्याबरोबरच या कंपनीत स्थानाकांना प्राधान्याने घेण्याबाबत विचारणा केली. कंपनीतील मासळीचा काहीच त्रास होत नाही. साहेब बाहेर गेले आहेत, असे कारण सांगून तेथील संस्था चालकाने ग्रामस्थांचे बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आगामी काळात तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. सीफूड कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरातील भातशेती धोक्यात आली असून, मानवी आरोग्यदेखील संकटात आले आहे. वेगवेगळे आजार उद्भवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी सचिन म्हात्रे, धीरज म्हात्रे, विलास ठाकूर, जयवंत थळे, अनंत म्हात्रे, नरेंद्र पाटील, शत्रुग्न ठाकूर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आजूबाजूच्या गावांना दुर्गंधीचा त्रास
वेलवली येथील पुष्पाई सी फूड कंपनीतील मासळीची दुर्गंधी आजूबाजूच्या गावांना त्रासदायक ठरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी वढाव गावात दुर्गंधी वाढल्याने अनेकांना त्याचा त्रास झाला होता. त्यामुळे नाक दाबून, दरवाजा बंद करून राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याची चर्चा समोर आली आहे.
वेलवली येथील पुष्पाई सी फूड या कंपनीतून दूषित पाणी सोडले जात आहेत. परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मुले, इतर मंडळी या दुर्गंधीमुळे आजारी पडू लागली आहेत. भातशेती संकटात आली आहे. रोगराई उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्प येत असताना स्थानिकांचा विचार केला जात नाही. ही मोठी चिंतेची बाब आहे.
सचिन म्हात्रे,
ग्रामस्थ
पुष्पाई सीफूड कंपनी वेलवली परिसरात आहे. मासळी स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पॅकिंग करून देश-विदेशात मासळी पाठविण्याचे काम कंपनीमार्फत केले जात आहे. कंपनीतील टाकाऊ वाया जाऊ नये, यासाठी कंपनीच्या तीन एकर जागेत बाग तयार करण्यात आली आहे. दुर्गंधी पसरू नये, यासाठी नियोजन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
मंदार गाळींदे, मालक
पुष्पाई सी फूड कंपनी







