| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अलिबाग येथील स्व. महेश देशमुख नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांना नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड्स 2025 मध्ये आदर्श पतसंस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देत संस्थेचे चेअरमन ॲड. परेश अनंतराव देशमुख यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान स्विकारण्यासाठी सेक्रेटरी महेंद्र राघव पाटील, संचालक संदीप अरुण घरत , संचालक संतोष धर्माजी पालकर, कर्मचारी प्रतिनिधी प्रकाश हरिश्चंद्र जाधव आदी उपस्थित होते.
सहकार चळवळीतील दूरदृष्टी, समर्पण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना गौरवण्यासाठी या पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे मंगळवारी (दि.4)आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे , महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ.प्रवीण दरेकर, वारणा सहकारी दूध उत्पादक संघ लि.चे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग प्रधान सचिव प्रवीण दराडे, शिवसेना उपनेते आ. सचिन अहिर, श्रीनिवास राव, संजय मलमे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. परेश अनंतराव देशमुख यांनी या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करीत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. स्व. महेश देशमुख नागरी सहकारी पतसंस्था या माध्यमातून समाजात आर्थिक आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराने आणखी बळ मिळाले आहे. हा पुरस्कार आमच्या सर्व सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी व हितचिंतकांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे, असे ॲड. देशमुख यांनी सांगितले. स्व. महेश देशमुख पतसंस्थेला पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







