50 वर्षाचा खडतर प्रवास संपणार
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापुर तालुक्यातील ग्रामीण शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबे-बर्गेवाडी रस्ता वन खात्याच्या अडथळ्यामुळे दुरुस्ती पासून वंचित राहिला होता. त्यामुळे येथून प्रवास करणे अनेकांना कठीण बनले असता गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासूनचा येथील नागरिकांचा खडतर प्रवास सुखकर व्हावा यासाठी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच महेश पाटील यांनी विशेष प्रयत्न करत ढेबेवाडी- बर्गेवाडी या गावांसाठी जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वन खात्याची परवानगी मिळवून देत 3/2 चा दावा मंजूर केल्याने येथील ग्रामस्थांनी पाटील यांचे आभार मानले आहेत. पुढील काळात हा रस्ता खड्डेमुक्त होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वन खात्याची मिळालेली मंजुरी बद्दल वनविभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. त्यामुळे ग्रामस्थांचा 50 वर्षाचा खडतर वाटचालीचा वनवास आता संपणार आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील काही रस्ते हे वनखात्याच्या आडकाठी पणामुळे रखडल्याने अनेकांना पायवाट व खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने अनेक जण वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत असताना असाच शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबे -बर्गेवाडी रस्ता वन खात्याच्या अडथळ्यामुळे 50 वर्षाहून अधिक काळापासून रखडला असता येथील नागरिकांना 1 किलोमीटरहून अधिक अंतर रानावनातून पायवाटेने, पावसाळ्यात चिखल व गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याने येथील ग्रामस्थ मोठ्या समस्येत सापडल्याचे दिसून येत असताना येथील विद्यमान सरपंच महेश पाटील यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने खड्डेमय व खरंतर प्रवासापासून येथील नागरिकांची आता सुटका होणार आहे. वनविभागाचे तालुका अधिकारी राजेंद्र पवार यांची सरपंच महेश पाटील यांनी ग्रामस्थासह भेट घेत वनविभागाचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवकर, सरपंच महेश पाटील, गीता बांदल, संदीप मोरे, विजय ढेबे, रवींद्र पाटील, महेश कडू संदेश गोरडे, नाना पाटील, नितेश जाधव, प्रमिला पाटील, रघुनाथ ढेबे, अंकुश कदम, पांडुरंग बर्गे, संपत ढेबे, विष्णू पाटील, लक्ष्मण ढेबे, सचिन ढेबे, भांबू बर्गे, सचिन ढेबे आदी प्रमुख उपस्थित होते.
ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य
वनविभागाची परवानगी मिळाल्याने 50 वर्षाचा येथील नागरिकांचा वनवास आता संपणार असून, पुढील काळात या गावाला नवा रस्ता जोडण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
ढेबेवाडी- बर्गेवाडी हे कोयना प्रकल्पग्रस्त गाव, परंतु या भागात स्थलांतर झाल्यानंतरही त्यांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागत होते. गावापर्यंत जाणारा रस्ता हा वन विभागातून जात असल्यामुळे अनेक वेळा आजारी असणाऱ्या रुग्णांना डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन यावं लागत असे. आता रस्त्याला वनखात्याची परवानगी मिळणे हा त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे.
–महेश पाटील,
सरपंच शिरवली ग्रामपंचायत
शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबेवाडी बर्गेवाडी रस्ता वनखात्याचा परवानगीमुळे अनेक वर्ष रखडला होता. अनेक वेळा निधी मंजूर होऊनही रस्ता पूर्ण करता येत नव्हता, मात्र महेश पाटील यांनी सदर वनखात्याची परवानगी घेण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. अनेक त्रुटी पूर्ण करत 50 वर्षाहून अधिक काळ होऊन सुद्धा अनेकांना जे जमलं नाही ते त्यांनी करून दाखवल्या बद्दल त्यांच्या मनापासून आभार.
-रघुनाथ ढेबे,
ग्रामस्थ







