। पनवेल । प्रतिनिधी ।
सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीचे 90 टक्के दागिने हस्तगत केले आहेत.
सुदर्शन शिंगाडे यांच्या करंजाडे येथील घरातील सामान करंजाडे ते नवीन पनवेल तक्का येथे शिफ्टिंग करण्याचे काम आरोपी संदीपकुमार जैस्वाल (वय 24 रा. कांदिवली) व त्याच्या सहकारी गौरव शुल्का (वय 28 रा. मालाड) यांना दिले होते. मात्र त्यांनी आपसात संगनमत करून घरातील सामान पॅकिंग करत असताना घरातील लाकडी कपाटामध्ये ठेवलेलं सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंग, सोन्याचे मणी व देवींची मूर्ती असा लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. याबाबतची माहिती सुदर्शन शिंगाडे यांना मिळताच त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडतरे, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोलीस शिपाई विशाल दुधे पोलीस नाईक सुभाष राठोड आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासद्वारे या दोन्ही आरोपीना मुंबई येथून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या गुन्यातील मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याबाबत पुढील तपास पोना सुभाष राठोड करीत आहेत.







