| उरण | प्रतिनिधी |
इच्छापूर्ती करणारा चिरनेरचा महागणपती म्हणून श्रींची कीर्ती दूरवर पसरल्याने दीपावलीच्या महत्त्वाच्या सणानंतर शनिवारी (दि. 8) आलेल्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने अनेक भाविकांनी आपापल्या कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी भाविक श्रींच्या दर्शनासाठी तल्लीन होऊन मंदिर परिसरात ये-जा करताना दिसत होते. तसेच नवीन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांची पूजाअर्चा करताना वाहन मालक कुटुंबासह मित्रपरिवाराच्या उपस्थित दिसत होते.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकष्ट चतुर्थी आल्याने सकाळपासून भाविकांनी आपल्या कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी मंदिरात आरती, भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ घेता यावे यासाठी महागणपती मंदिर ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ विशेष सहकार्य करत होते. यावेळी मंदिर परिसरात फुले हार यांची दुकाने सजली होती. तर खाद्य पदार्थ, खेळण्याची दुकाने थाटली होती. तसेच चिरनेर गावचे खास आकर्षण असलेल्या मातीच्या भांड्याची व गावठी भाजीपाल्याची खरेदी करताना भाविक विशेष करून महिला दिसत होत्या. यावेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत होते.







