| मुंबई | प्रतिनिधी |
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काही विश्वसनीय सूत्रांकडे ‘माझा गेम केला जाणार’ अशा गंभीर स्वरूपाचे इनपुट असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, मी अमेरिकेत असताना मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत, त्यात तुमचा गेम केला जाणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मला सांगण्यात आले की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगले. मला स्पष्टपणे सावध राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत, असे दमानिया यांनी सांगितले. तसेच, अंजली दमानिया यांनी अजून एक महत्त्वाची बाब उघड केली आहे. त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच त्यांना हा इशारा मिळाला होता. या सर्व परिस्थितीतही दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.







