डोक्यामागे गंभीर जखमा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील मोठेभुम गावात रविवारी (दि.9) मध्यरात्री एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या गावातील 90 वर्षांच्या हिराबाई जनार्दन जोशी या वृद्ध महिला आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा आढळून आल्याने परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री सुमारे 1.25 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिला एकट्याच राहत असून त्यांना तीन मुली व एक पुतण्या आहे. त्यांच्या पुतण्याने उरण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना, वृद्ध महिला पडून जखमी होऊन मृत झाल्याची माहिती दिली. त्यांनतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व आय-बाईक टीमला बोलावून पंचनामा करण्यात आला. त्या वृद्धेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आला असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच, नेमक्या जखमा कशामुळे झाल्या, हे स्पष्ट होण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने मोठेभुम गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.






