मर्जीतील तलाठ्यांना आवडीच्या सजासाठी पाच लाखांची बोली?
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मागील मे महिन्यात तलाठ्यांची अलिबाग तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात नियमित बदली करण्यात आली. परंतु, काही मर्जीतील तलाठ्यांची बदली सेवावर्गच्या नावाखाली तीन महिन्यांत पुन्हा अलिबागमध्ये करण्यात आल्याची चर्चा सध्या महसूल विभागात सुरू आहे. आवडीच्या सजासाठी या तलाठ्यांना पाच लाख रुपये मोजावे लागल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे महसूल विभागातील लाखोंचा बाजार उघड होत आहे. हे तलाठी कोण आहेत, हे लवरच उघड होणार आहे.
जमिनीची नोंद ठेवणे, महसूल गोळा करणे, वारसा हक्कासाठी वारसांची नोंद करणे, आपत्कालीन परिस्थितीत नुकसान झालेली माहिती घेणे, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, सभा बैठकांमधून माहिती देणे, नुकसानीचे पंचनामे करणे, ही कामे तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत केली जातात. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाखांहून अधिक असून, एक हजारांहून अधिक गावे आहेत. जनता आणि प्रशासन यातील मधला दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात तलाठ्यांचे प्रचंड महत्त्व आहे.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे एका तलाठ्याकडे दोन ते तीन सजांमधील कारभार सोपविला जात आहे. तर, काही तलाठ्यांकडे चार सजा दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. तरीदेखील तलाठ्यांचे काम प्रामाणिकपणे करीत असतात. प्रशासकीय कामकाजासह वेगवेगळ्या नोंदीची माहिती ठेवणे, वरिष्ठांच्या बैठकामध्ये सहभागी होऊन कार्यवाही करणे, अशा अनेक प्रकारची कामे तलाठी करीत असतात.
रायगड जिल्ह्यात तलाठ्यांची 510 पदे मंजूर असून, 105 पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या 305 तलाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत. सहा वर्षे एका तालुक्यात, तसेच एका सजामध्ये तीन वर्षे सेवा केलेल्या तलाठ्यांची बदली मागील मे महिन्यात करण्यात आली. अलिबागसह अनेक तालुक्यांतील तलाठ्यांची वेगवेगळ्या तालुक्यात बदली झाली. सुमारे 40 हून अधिक तलाठ्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बदली झालेल्या काही तलाठ्यांना पुन्हा सेवावर्गच्या नावाखाली अलिबागमध्ये बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी लाखोंचा घोडेबाजार झाल्याची चर्चा महसूल विभागात सुरु आहे.
सेवावर्गच्या नावाखाली अलिबागमध्ये पुन्हा आलेल्या तलाठ्यांना मर्जीतील सजा देण्यात आले आहे. यातील काहींकडून पाच-पाच लाख घेतल्याची चर्चा महसूल विभागात आहे. यापूर्वीही बोली एक लाख होती. आता पाच पटीने बोली वाढली असल्याचे बोलले जात आहे. खालापूर, पेण, कर्जत तालुक्यात बदली झालेल्या तलाठ्यांना पुन्हा अलिबागमध्ये सेवावर्गच्या नावाखाली आणण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या मर्जीतील सजा देण्यात आले असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. जिल्ह्यातील अलिबागसह पनवेल, उरण, या तालुक्यात हा कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने सेवावर्गची गरज आहे, त्यांना मात्र फारसा महसूल विभागाकडून प्रतिसाद दिला जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रकार आटोक्यात आणण्यास रायगडचे जिल्हाधिकारी यशस्वी ठरतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सेवावर्ग बदलीचा असा कारभार
तालुक्यात नियमित बदली झालेल्या तलाठ्यांना सेवावर्ग म्हणून दुसऱ्या तालुक्यात घेतले जाते. त्या तलाठ्यांचे वेतन, सेवा पुस्तिका नियमित बदली झालेल्या तालुक्याच्या ठिकाणी राहणार, फक्त कामकाज दुसऱ्या तालुक्यातील सजामधून केले जाणार, असा हा कारभार चालतो.







