निवडणूकीच्या तोंडावर आमदारांकडून पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गासाठी निधी मंजूर झाल्यानंतर आ. दळवींसह महायुतीतील अनेक नेत्यांनी आपापल्या स्टाईलने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधासभा निवडणूकीच्या जाहिरनाम्यात या मार्गाचा उल्लेख करीत आमदारांनी रस्ताा स्वतःच्या पैशातून करुन देण्याचे गाजरही मतदारांना दाखवले. अलिकडेच या मार्गावरील वढावजवळील पूल कोसळल्याने पुन्हा एकदा अलिबाग-रोहा मार्ग चर्चेचा विषय ठरला. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा असताना, आमदारांकडून पुन्हा एकदा त्याच रस्त्याचं भूमीपूजन करण्यात येत आहे. निवडणुकीचा माहोल तापू लागल्याने मतदारांना खुश करण्यासाठी दिली जात असलेली ही चिटर आश्वासनं आता लोकांच्या नाराजीचं कारण ठरत आहेत. रस्ता एक आणि भुमीपूजन अनेक अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याचे काम अद्याप पुर्ण झाले नसून प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर भूमीपूजनाचं नाटक रचलं जातं, आणि आश्वासनांचा पाऊस पडतो. मात्र, रस्त्याचे काम केव्हा पुर्ण होणार हा प्रश्न जनतेसमोर अजूनही अनुत्तरित आहे. आता निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या 2 डिसेंबरला नगरपालिका, नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. येत्या काळात जिल्हा परिषदेसाठीही मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आ. दळवी यांनी रस्त्याच्या कामाचं नाटक सुरु केलं आहे. दरवेळी निवडणुका जवळ आल्या की त्याच रस्त्याचं पुन्हा एकदा भूमीपूजन करून काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवता येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हा मार्ग कधी पूर्ण होणार, याबाबत साशंकताच आहे. कारण यापुर्वीही आमदारांनी हाच रस्ता पक्का करण्याचं जाहीर आश्वासन दिलं होतं. भूमीपूजनाच्या कार्यक्रमात नारळ फोडून, पूजा करून, मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण प्रत्यक्षात आजही या रस्त्याचे काम अपुर्णच आहे.
या मार्गावरील वढाव गावाजवळील पुल कोसळल्यानंतर नागरिकांनी आक्रमक भुमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करुन दोन दिवसांत पुल उभा केला. मात्र, श्रेय लाटण्यासाठी पुन्हा एकदा आमदार महोदय भुमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. रस्त्याचं काम सुरू न होता फक्त भूमीपूजनासाठीच हा मार्ग असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केले असून त्यांना आता नारळफोडी, भाषणं आणि खोटी आश्वासनं नकोत तर प्रत्यक्ष काम हवं आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
चिटर आश्वासन
दोन दिवसांपुर्वीच आ. महेंद्र दळवी यांनी ते स्वतः चिटर आमदार असल्याची कबुली दिली असल्याचा गौप्यस्फोट आ. अनिकेत तटकरे यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, वारंवार होणारं भूमीपूजन हे फक्त निवडणुकीपूर्वीचं चिटर आश्वासन असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.







