कोलकाताच्या ईडन गार्डनवर चॅम्पियन्सचं वस्त्रहरण
। कोलकाता । वृत्तसंस्था ।
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर कर्णधार बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, भारतीय संघाच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 55 षटकांमध्ये 159 धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेची सुरूवात संथ झाली. एडन मार्करम याने सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय रायन रिकलटन 23, विआन मल्डर 24 आणि टोनी डी झोर्झी 24 धावा काढून परतले. या चार फलंदाजांव्यतिरिक्त एकालाही 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार टेम्बा बावुमा फक्त तीन धावांवर आऊट झाला. ट्रिस्टन स्टब्स याने 15 धावा काढून एक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सलामीवीरांची विकेट गेल्यानंतरच साऊथ आफ्रिकेचा डाव ढेपाळण्यास सुरूवात झाली.
जसप्रीत बुमराहचा पंच
जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक स्विंग आणि अचूक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये एडन मार्करम, रायन रिकलटन, टोनी डी झोर्झी आणि केशव महाराज यांच्या महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. तर मोहम्मद सिराजने मार्को जानसेन आणि काईल वेरेन्ने या दोघांना त्रिफळाचित करत दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने केवळ 14 ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यातील 5 ओव्हर्स मेडन होत्या. त्याच्या करिअरमधील हे 16वे 5-विकेट हॉल ठरला. विशेष म्हणजे, ईशांत शर्मानंतर कसोटीच्या पहिल्याच दिवशी 5 विकेट घेण्याचा पराक्रम बुमराहने केला. ईशांतने हेच काम 2019 मध्ये याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध साध्य केले होते.
कुलदीपने दाखवली फिरकीची जादू
भारताच्या फिरकीपटूनेदेखील कमाल केली. भारतीय संघाने खेळवलेल्या चार फिरकीपटूंपैकी कुलदीप यादव याने कर्णधार बावुमासह दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली. वॉशिंग्टन सुंदर याला विकेट मिळाली नसली तरी त्याने दुसऱ्या बाजूने दबाव कायम ठेवला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळल्यामुळे टीम इंडिया आता पहिल्या डावामध्ये मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
ईडन गार्डन्सवरील सर्वात कमी धावसंख्या
ईडन गार्डन्सवरील परदेशी संघाने पहिल्या डावात केलेली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी पहिल्या डावातल्या सर्वात कमी धावसंख्या बांगलादेशच्या नावावर आहेत. 2019 मध्ये बांगलादेशचा अवघ्या 106 धावांवर ऑलआउट झाला होता. दुसरी सर्वात कमी धावसंख्या वेस्ट इंडिजची आहे. 2011 मध्ये 153 धावांवर वेस्ट इंडिजचा संघ ऑलआउट झाला होता. आता, 159 धावांसह दक्षिण आफ्रिका या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.







