। मुंबई । प्रतिनिधी ।
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या 98 वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. पत्रकार विक्की लालवानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही बातमी निश्चित केली आहे. त्यांच्या कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने सांगितले की, कामिनी कौशल यांचे कुटुंब अत्यंत खासगी जीवन जगणारे आहे आणि त्यांना प्रायव्हसीची गरज आहे. कामिनी कौशल यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1927 रोजी झाला होता आणि त्यांनी 1946 मध्ये नीचा नगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच चित्रपटाने पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता आणि पाल्मे डी ओर पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय चित्रपट राहिला. कामिनी कौशल यांनी स्वातंत्र्यापूर्वी, म्हणजेच 1946 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नीचा नगर या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. अशा प्रकारे कान्स फिल्म फेस्टिव्हलशी जोडली जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणूनही त्यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले. कामिनी कौशल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. यात दो भाई (1947), नदिया के पार (1948), जिद्दी (1948), शबनम (1949), पारस (1949), आदर्श (1949), आरजू (1950), झांझर (1953), आबरू (1956), बड़ी सरकार (1957), जेलर (1958), नाइट क्लब (1958),गोदान (1963) या चित्रपटांचा समावेश आहे.




