| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.15 नोव्हेंबरपर्यंत फक्त वसंत गजानन यादव यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाला आहे. आज शनिवारी एकही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाला नाही. आता रविवार आणि सोमवार (दि.16 आणि 17) असे दोनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिले आहेत. प्रामुख्याने सोमवार, दि. 17 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकदम गर्दी होईल, असा अंदाज आहे.
नगराध्यक्षपदाकरिता त्या-त्या पक्षांकडून अंतर्गतरित्या नाव ठरलेही असेल; परंतु जोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होत नाही, तोपर्यंत ते अधिकृत मानता येणार नाही. सांप्रतच्या निवडणुकीपूर्वी श्रीवर्धन न.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच (अ.प.गट) सत्तास्थानी होता. यावेळी या पक्षामध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार इच्छुक असल्याचे समजते. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.प.गट) व शिवसेना (उबाठा) हे दोन्ही पक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.







