| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चार दिवसांपासून सुरू झाली आहे. शनिवार (दि. 15) पर्यंत एकूण 153 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात 140 नगरसेवक व 13 नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी दहा, तर नगरसेवक पदासाठी 217 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोमवार (दि.10)पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीचे दोन दिवस एकहा अर्ज दाखल झाले नाही. मात्र, तिसऱ्या दिवसापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. शनिवार (दि.15)पर्यंत 153 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
खोपोली नगरपरिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी 16, नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी 21 अर्ज भरण्यात आले आहेत. श्रीवर्धनच्या नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, नगरसेवक पदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. मुरूड-जंजिराच्या नगरसेवक पदासाठी 27 व नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाले आहेत. रोह्याच्या नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. महाडमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले आहेत. पेणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. परंतु, नगरसेवकपदासाठी 21 अर्ज प्राप्त झाले आहेत. उरणमध्ये नगरसेवक पदासाठी 50 व नगराध्यक्षपदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. कर्जतमध्ये फक्त नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. माथेरानमध्ये एकही अर्ज दाखल झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.







