शाळेतील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
| मुंबई | प्रतिनिधी |
मधल्या सुट्टीत शाळेच्या उपहारगृहातील वडापाव खाल्ल्याने के.व्ही.के. घाटकोपर स्कूल येथील 15 ते 16 मुलांना विषबाधा झाली आहे. ही मुले साधारणपणे इयत्ता पाचवी ते आठवीतील आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील के.व्ही.के. घाटकोपर स्कूलमध्ये सकाळच्या सत्रात इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. सोमवारी (दि.17) सकाळच्या सत्रातील मधली सुट्टी झाल्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीतील काही मुलांनी शाळेच्या उपहारगृहातील वडापाव खाल्ला. त्यानंतर जवळपास 15 ते 16 मुलांना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी तातडीने जवळील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलवले. तसेच मुलांच्या पालकांनाही कळविले. डॉक्टरांनी तातडीने धाव घेऊन विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केले. तसेच काही पालकांनी त्यांच्या मुलांना घेऊन खासगी रुग्णालयामध्ये धाव घेतली. विषबाधा झालेल्या तीन मुलांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असले तरी त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्यास नकार दिल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाला यांनी दिली.
याप्रकरणी चिरागनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. त्यांनी उपहारगृहातील सर्व साहित्य व स्वयंपाकाचा शिधा असे सर्व सामान ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.







