जिल्हाधिकारी किशन जावळेंकडून आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका यांना लागू राहणार नाही.
रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपापली वाहने घेऊन येत असतात. त्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरु असल्याने त्यामधून देखील मुंबई येथून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा मार्ग अरूंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नेहमीच अपघात होत असतात. तसेच, दर शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्टीला मुंबई येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, विद्यार्थी तसेच पर्यटकांना प्रवासाकरिता जास्तीचा वेळ लागतो. त्याचबरोबर रुग्णवाहिकांना या वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णाच्या जीवितास धोका संभावू शकतो. त्यामुळे अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक व जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर दररोज सकाळी 8 ते दु. 12 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे.







