पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाहनचालकांसह नागरिकांचे हाल
| ठाणे | प्रतिनिधी |
शहर आणि उपनगरांत रविवारी सीएनजीचा गंभीर तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शहरातील अनेक सीएनजी कंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक झालेल्या तुटवड्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. आरसीएफ कंपाऊंड येथील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम शहरातील सीएनजीच्या पुरवठ्यावर झाला. तर गॅस नसल्याने टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारीत खासगी वाहनांच्या सेवा प्रभावित होऊ लागल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर धावत आहेत. ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतुक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडतात. या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत. तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसविण्यात आल्या आहेत.
सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेक रविवारी सीएनजी पंपवर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपवर इंधन मिळावे यासाठी अक्षरश: शोधाशोध सुरु होती. ठाण्यातील काही सीएनजी पंपवर एक ते दीड किमी पर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. सीएनजी उपलब्ध न झाल्याने रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला. तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. बसथांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती. त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.







