| नागोठणे | प्रतिनिधी |
चेष्टा मस्करीचे रूपांतर भांडणात झाल्याने नागोठण्यातील मशीद मोहल्ला येथील झोहेब अनिस अधिकारी (31) या तरुणाने नागोठण्यातीलच हुजरा मोहल्ला येथील अरबाज आयूब पानसरे या 26 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याच्या शरीरावर नऊ ठिकाणी सपासप वार केले. या हल्ल्यात अरबाज पानसरे हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना नागोठणे रिलायन्स सर्कल अरबाज पानसरे या तरुणाच्या मोटारसायकल गॅरेज मध्ये सोमवारी (दि.17) दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध माहितीनुसार, अरबाज पानसरे या तरुणाच्या अकबर ऑटो गॅरेजमध्ये कामानिमित्त आलेला झोहेब अधिकारी हा अरबाज याची चेष्टा मस्करी करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करी व भांडण करू नकोस, असे अरबाज हा झोहेब याला बोलला. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी झोहेब याने अरबाज याला तुला ठार मारून टाकतो, अशी धमकी देऊन अरबाज यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने झोहेब याने सोबत आणलेल्या चाकूने अरबाज याच्या कानाजवळ, डोक्यावर, पाठीत, छातीवर, बरगडीवर असे संपूर्ण शरीरावर नऊ ठिकाणी सपासप वार करून जखमी केले. या प्रकरणी आरोपी झोहेब अधिकारी याच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अरबाज याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी हे करीत आहेत.







