अलिबाग-पेझारी एसटी बसमधील घटना; प्रवासीवर्गातून नाराजीचे सुर
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग-पनवेल मार्गावर दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. खासगी प्रवास परवडत नसल्याने बहुतांश नोकरदार व विद्यार्थी एसटीवर अवलंबून असतात. मात्र, एसटी वेळेवर न येणे तसेच मध्येच रस्त्यात बंद पडणे या घटनांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि प्रवाशांसोबत उध्दटपणे वागण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. त्यामुळे अलिबाग-पनवेल मार्गावरील प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.
अलिबाग व पनवेल ही दोन्ही शहरे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यामुळे दररोज अलिबाग ते पनवेल या मार्गावर हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावरील पेण, वडखळ, पोयनाड, पेझारी, कार्लेखिंड, खंडाळे, वाडगाव येथून पनवेल व अलिबाग येथे नोकरदारांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. ते खासगी प्रवास परवडत नसल्याने ते पुर्णतः एसटीवर अवलंबुन असतात. अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी विनाथांबा बस सेवा देखील सुरू आहे. तरीदेखील या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासंतास एसटीची वाट बघावी लागते. या त्रासातच प्रवासी वर्गाला एसटी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा देखील सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार सोमवारी (दि.17) सकाळच्या सुमारास अलिबाग-पेझारी या एसटी बसमध्ये घडला आहे. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अलिबाग एसटी स्थानकात अलिबाग-पनवेल या मार्गावरील प्रवाशांनी एसटीची जवळजवळ एक तास वाट पाहिली. तरीदेखील या मार्गावरून जाणाऱ्या एसटीचा काहीच ठावठिकाणा नव्हता. त्यांनतर या मार्गावर धावणारी अलिबाग-पेझारी एसटी फलाटावर लागली. एसटी उशीरा लागल्याने फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. अलिबाग ते पेझारी दरम्यान उतरणाऱ्या प्रवाशांनी बसमध्ये चढायला सुरूवात करताच वाहकाने सगळ्यांना बसच्या शेवटच्या सिटकडे जाण्यास सांगितले. त्यांनतर एसटी वाहकाचा आवाज वाढत गेला आणि त्याने महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांसोबद उध्दटपणे बोलायला सुरूवात केली. त्यातील बऱ्याचश्या प्रवाशांना जवळच्या थांब्यावर उतरायचे होते. त्यामुळे त्यांनी बसच्या दरवाजाजवळ उभे राहून गर्दी केली होती. त्यावेळी एसटीच्या वाहकाने दरवाजाजवळील जागा रिकामी करायला सांगितली. त्यातील काही प्रवासी मागच्या सिटकडे गेले आणि ज्यांना लगेचच उतरायचे होते म्हणून ते प्रवासी दरवाजाजवळच उभे राहिले. तरीदेखील वाहकाने त्यांना धक्का देत मागे जाण्यास सांगितले. पुढे त्यांच्यात वाद वाढत गेला आणि इतर प्रवाशांनी संबंधित प्रवाशाला नमते घेण्यास सांगितले. त्यामुळे हा वाद संपुष्टात आला. यादरम्यान, आम्ही सहकार्य करतो म्हणून हे एसटी कर्मचारी अती करत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला.
वाहकाची अरेरावी
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी म्हणजेच एसटी बस ही आता कर्मचारऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बदनाम होत आहे. आधीच एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता एसटी वाहकाच्या आरेरावीमुळे ती आणखीनच बदनाम होत चालली आहे. एसटी बसमधील प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी चालक-वाहक आणि इतर कर्मचारी प्रवाशांची काळजी घेत असतात. परंतु, एसटी वाहकाच्या अरेरावीमुळे प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मळित असल्याने प्रवासी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत.
संबंधित वाहकाच्या विरोधात तक्रार आलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. प्रवाशांना चांगली वागणूक देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करू.
– राकेश देवरे, व्यवस्थापक, एसटी आगार-अलिबाग







