| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात विविध हंगामात वेगवेगळी पिकं घेतली जातात. पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यातील विविध पिकासाठी रायगड प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात भाताचे पीक, हिवाळ्यात विविध कडधान्य पीक तर हिवाळा-उन्हाळ्यात विविध भाजीपाला व कलिंगड आदी पिकं जिल्ह्यात घेतली जातात. गेले कित्येक वर्षे हे चक्र सुरू आहे. जूनला सुरू झालेला पावसाळा सप्टेंबर अखेर परतीला लागतो व ऑक्टोबर महिन्यात हिवाळी शेतीची कामे सुरू होतात. या वर्षी मात्र ऑक्टोबर महिना संपला तरी पावसाने उघडीप दिली नाही. सतत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची कापणीसह सर्वच कामे रखडली आहेत.
ऑक्टोबर महिन्यात कडधान्ये शेतीची लागवड केली जाते. काही शेतकरी भात कापणीपूर्वी वाळ, मटकी इत्यादी कडधान्य शेतात पेरतात. पाऊस जाईल या आशेवर काही शेतकऱ्यानी शेतात कडधान्ये पेरली होती; मात्र सततच्या पावसाने पेरलेले बियाणे सुद्धा वाया गेले आहे. हिवाळी पिकांसाठी आवश्यक असलेले वातावरण न मिळाल्यास या पिकांवर लक्ष ठेऊन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. भातशेतीचे पावसाने अगोदरच नुकसान केले असताना हिवाळी शेतीही लांबल्याने शेतकऱ्यांना मोठी चिंता लागून राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात कापणीपूर्वी कडधान्ये पिकांची पेरणी करतो. योग्य ओलाव्यामुळे ही पिके बहरात येतात. या वर्षी मात्र पावसाने अजून उघडीप दिली नाही. त्यामुळे पेरणी कधी करायची व रुज कधी व कशी होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पेरणी केल्यास त्याची वाढ होणार नाही.







