। मुंबई । प्रतिनिधी ।
कुर्ला पश्चिम येथे बुधवारी (दि.19) दुपारी गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक एक गॅस वाहिनी फुटली आणि त्यामुळे आगीचा भडका उडाला. या आगीत येथील चार दुकाने जळून भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून पालिकेने कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर परिसरातील गटाराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. येथील जुने गटार बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने तोडण्यात येत होते. त्याच वेळी येथील गॅस वाहिनी फुटली. त्यानंतर काही क्षणातच आगीचा भडका उडाला. ही बाब येथील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानाबाहेर धाव घेतली आणि पोलीस, अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागलेल्या दुकानांलगत मुबारक सोसायटी आहे. या इमारतीपर्यंत आग पोहचण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन दल आणि पोलिसांनी रहिवाशांना तत्काळ इमारत रिकामी करण्याची सूचना केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.







