अनेकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले; कागदपत्रांची पुर्तता न केल्याने छाननीत अर्ज बाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबागसह दहा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 963 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.18) झालेल्या छाननीमध्ये 182 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यात 17 नगराध्यक्ष व 165 नगरसेवकपदाच्या उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांचे नगराध्यक्ष व नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड- जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये 107 प्रभाग आहेत. नगराध्यक्ष पदाच्या दहा आणि नगरसेवक पदाच्या 217 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दोन डिसेंबरला 308 मतदान केंद्रामध्ये दोन लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणर आहेत. तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (दि.10) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आली. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी 63 अर्ज तर नगरसेवकपदाच्या 217 जागांसाठी 900 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी मंगळवारी (दि.18) सकाळी अकरा ते एक या वेळेत झाली. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे 781 अर्ज वैध असून त्यात नगराध्यक्षपदाचे 46 व नगरसेवकपदाच्या 735 अर्जाचा समावेश आहे. रोहामध्ये नगराध्यक्ष पदाचे सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले
जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी केलेल्या अर्जापैकी 182 अर्ज अवैध ठरविले आहेत. त्यात नगरसेवकपदाचे 165 आणि नगराध्यक्षपदाचे 17 अर्ज अवैध आहेत. या छाननीमध्ये खोपोलीमधील नगराध्यक्षपदाचे दोन, नगरसेवकपदाचे 19,अलिबागध्ये नगराध्यक्षपदाचे एक, नगरसेवकपदाचे अकरा, श्रीवर्धनमधील नगराध्यक्षपदाचे एक, नगरसेवकपदाचे सहा, मुरूडमधील नगराध्यक्षपदाचे एक, नगरसेवकपदाचे 12 अर्ज अवैध ठरविल आहेत. रोहामधील नगरसेवकपदाचे 17 अर्ज अवैध ठरविले आहेत. महाडमधील नगरसेवकपदाचे 24, नगराध्यक्ष पदाचे तीन, पेणमध्ये नगरसेवक पदाचे 16, नगराध्यक्ष पदाचे एक, उरणमध्ये नगरसेवकपदाचे 25 व नगराध्यक्ष पदाचे चार, कर्जतमध्ये नगराध्यक्ष पदाचे तीन व नगरसेवक पदाचे 34 आणि माथेरानमधील नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरविले आहेत.अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप 21 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वैध असलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या
| नगरपरिषद | नगराध्यक्ष | नगरसेवक |
| खोपोली | 8 | 169 |
| अलिबाग | 5 | 64 |
| श्रीवर्धन | 4 | 62 |
| मुरूड-जंजिरा | 4 | 62 |
| रोहा | 3 | 61 |
| महाड | 5 | 50 |
| पेण | 4 | 87 |
| उरण | 5 | 53 |
| कर्जत | 5 | 58 |
| माथेरान | 3 | 69 |
| एकूण | 46 | 735 |







