। पनवेल । प्रतिनिधी ।
शीव- पनवेल मार्गावरून उरणच्या दिशेने जाणारा टँकर आज सकाळी साडे सहाच्या सुमारास पलटी झाला आहे. या टँकरमध्ये द्रव रूपातील डांबर असून, ते रस्त्यावर फैलू नये याची काळजी घेतली जात आहे. हा ज्वलनशील पदार्थ असल्याने अग्निशमन दलाची मदत घेतली जात आहे. मार्ग पूर्ववत होण्यास संध्याकाळचे पाच तरी वाजतील असे वाहतूक पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर खिंड पासून उरणच्या दिशेने जाणारा एक डांबर घेऊन जाणारा टँकर एकता सोसायटी समोरील मार्गावर पलटी झाला. अपघात विचित्र गतिरोधकामुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. घटना घडताच वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले उपस्थित झाले. टँकर मधील असणारे द्रव रूपातील डांबराचे तापमान 180 डिग्री सेल्सियस असून, जवळपास उकळते आहे. त्यात डांबर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग ही लागू शकते या शक्यतेने तातडीने सीबीडी आणि नेरुळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे.
ज्वलनशील पदार्थ असल्याने क्रेन किंवा अन्य साधने वापरून टँकर बाजूला करताना अपघात होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता सकाळी दहाच्या सुमारास अन्य टँकर मागवण्यात आला असून, त्यात हे डांबर काढण्यात येणार आहे. त्या नंतर अपघात ग्रस्त टँकर बाजूला केला जाणार आहे. या मार्गावरून जेएनपीटी आणि उरण दिशेने मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहनांची वर्दळ असते तसेच अन्य वाहतूक ही मोठ्या प्रमाणात असते. याच मार्गाने नवी मुंबई मनपा मुख्यालय असल्याने त्या ठिकांचीही हलकी वाहणे आणि दुचाकीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. हा अपघात झाल्याने ही सर्व वाहतूक खोळंबली होती. मात्र, सकाळची वेळ असल्याने त्यावेळी जड अवजड वाहनांच्या व्यतिरिक्त फारशी वाहतूक नव्हती. त्यामुळे मोठी वाहतूक सुरु होण्यापूर्वी एकेरी मार्ग सुरु करण्यात यश आले आहे. आगीची कुठलीही घटना घडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.







