| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील गणपती वाडी स्टॉपजवळील हॉटेल सौभाग्य इनच्या समोर दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घडलेल्या दुर्घटनेत पेण शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटेनेने शहरात शोककळा पसरली आहे. पेण शहरातील निलेश पाटील (22) राहणार नदीमाळ नाका आणि वरद अमित सुतार (19) राहणार परीट आळी हे दोन्ही मित्र स्पोर्ट्स बाईकवरून खोपोलीकडे जात होते.
गणपती वाडी स्टॉपजवळील हॉटेल सौभाग्य इनच्या समोर त्यांच्या बाईकचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात एवढा गंभीर होता की तिथे उपस्थित लोकांनी तात्काळ त्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात हलवले; मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून आवश्यक पंचनामा केला. मात्र, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संबंधित प्रकरणाची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.







