| सुधागड-पाली | वार्ताहर |
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत आंतरविभागीय खो-खो (मुले व मुली) स्पर्धा 18 व 19 नोव्हेंबर रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयातील जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर उत्साहात पार पडली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या निर्देशानुसार आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाच्या 711 पेक्षा अधिक महाविद्यालयांचा समावेश असलेल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण या चार विभागांतील संघांनी या
स्पर्धेत सहभाग घेतला. मुलांच्या गटात मुंबई उपनगर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ठाणे विभाग दुसऱ्या आणि कोकण विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात ठाणे विभागाने विजेतेपद मिळवले, तर मुंबई उपनगर आणि कोकण विभाग अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या स्पर्धेला सुएसोच्या अध्यक्षा गीता पालरेचा, रवींद्र लिमये, ग. रा. म्हात्रे, सुलतान बेनसेकर, तृप्ती मराठे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पंच खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या 15 उत्कृष्ट खेळाडूंचा संघ मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात सध्या कोणताही क्रीडा शिक्षक अथवा संचालक नसतानाही, महाविद्यालयाने ही राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली. प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संतोष भोईर आणि संपूर्ण महाविद्यालयीन टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. लहूपचांग, प्रा. संतोष भोईर, जिमखाना प्रमुख संजय काटकर, क्रीडा विभाग सदस्य दिपाली पांगारे, महेश राहींज, चिंतामण शिंगवा, विद्यार्थी प्रतिनिधी मुकुंद वारगुडे, स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. संदेश गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संतोष भोईर यांनी केले.
विद्यार्थी मैदानात उतरले नाहीत, घाम गाळला नाही, तर तीच ऊर्जा चुकीच्या दिशेने वळते. म्हणूनच आमच्या महाविद्यालयात क्रीडा विभाग बळकट करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
-डॉ. सुधाकर लहूपचांग
प्राचार्य, शेठ ज. नौ. पालीवाला
महाविद्यालय, पाली







