आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून लाठीमार
| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करत मोर्चा निघाला होता. यावेळी सर्व मोर्चेकरी आक्रमक झाले होते त्यांनी कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज करत मोर्चेकरांना पांगवलं. क्रूर हा शब्दही कमी पडेल असा गुन्हा आणि अत्याचर करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला जाहीर फाशी द्या, अशी मागणी करीत मालेगाव कोर्टाच्या आवारात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, पोलिसांनी कोर्ट परिसरामधून मोर्चेकरांना बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यावर ते आक्रमक झाले. काही मोर्चेकरी कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी खबरदारीने दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चामध्ये महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी बळाचा वापर करत त्यांना पांगवलं.
नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावातील साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 16 नोव्हेंबर रोजी चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती, त्यावेळी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले. नराधमाने तिला एका टॉवरजवळ नेले, तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली. पोलिसांच्या शोधमोहिमेत आरोपीही होता, त्यावेळी तपास सुरू असताना गावातील एका माहिलेने नराधमासोबत चिमुकलीला टॉवरकडे जाताना पाहिले होते. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
‘ती'ला डॉक्टरांनी वाचवलं, नराधमानं संपवलं
पीडित मुलीचा सातव्या महिन्यात जन्म झाला होता, तिचे वजन 900 ग्रॅम होते. त्यावेळी डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे तिला वाचवण्यात आलं होतं. मात्र, आता साडेतीन वर्षाची असताना नराधमाने तिला संपवलं. आरोपीला कोर्टात हजर करण्याच्या मार्गावर नागरिक जमले होते, त्यामुळे आरोपीला व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं. आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला, तरुणांनी गेट तोडले
आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि तरुण सहभागी झाले होते. सुरुवातीला बंदोबस्तातील पोलिसांनी गेट लावले आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, या घटनेने संतप्त झालेला जमाव जसा वाढला, तसा महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली.







