| उरण | प्रतिनिधी |
मालेगाव येथील बालिकेवरील हत्तेचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना महिला पदाधिकारी म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना गंभीर चिंता व्यक्त करीत आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. मुलीच्या वडिलांशी असलेल्या वैमनस्यातून सूड बुद्धीने त्याने हे भयानक कृत्य केल्याचे समजते.
इतक्या सहजपणे आरोपी एका कोवळ्या बालिकेवर इतका भयानक अत्याचार करू धजतो, याचा अर्थ गुन्हेगारांना पोलिस, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेची जराही भीती उरलेली नाही, हे स्पष्ट आहे. हे वास्तव अत्यंत गंभीर आहे. या घटनेतील आरोपीची लवकरात लवकर चौकशी करून त्याला कायद्याप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेले केली आहे.
दरम्यान, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटिल, अध्यक्षा सविता पाटील, सेक्रेटरी धनवंती भगत, खजिनदार लता पाटील, प्रमिला म्हात्रे, गीता पाटील, नयना म्हात्रे, उषा म्हात्रे, धनवंती भगत, कुंदा पाटील, रजनी पाटील, करूणा घरत, शारदा ठाकूर, माई ठाकूर, अपर्णा म्हात्रे, जयवंती पाटील, जयश्री माळी आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मालेगावमधील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला आहे.







