| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथे दोन दिवसीय रोलींग लाऊड कॉन्सर्ट या सांगितिक कार्यक्रमात चोरट्यांची चांदी झाली आहे. या कार्यक्रमाचे महागडी प्रवेशिका शुल्क असूनही हजारोंच्या संख्येने खारघरमध्ये तरूणवर्ग आला होता. मोठ्या आवाजातील सांगितिक कार्यक्रमात चोरट्यांनी शिरून जवळपास साडेदहा लाख रुपयांचे सोने चोरी केल्याच्या तक्रारी खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
खारघर उपनगरातील प्रभाग 31 येथे रोलिंग लाऊड इंडिया हिपहॉप म्युझिक फेस्टिव्हल साजरा झाला. 5 ते 50 हजार रुपये प्रवेशिका शुल्क असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रेक्षकवर्ग सुद्धा त्याच उच्चभ्रू घराण्यातील मुले व मुली होते. अखेरच्या क्षणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची तात्पुरत्या स्वरूपात परवानगी मिळवून मद्यविक्रीचे स्टॉल येथे आयोजकांनी उभारले होते. कार्यक्रमातील कर्कश आवाज आणि तरूणांईचा जल्लोष यामध्ये चोरट्यांनी प्रेक्षकांच्या आभुषणावर डल्ला मारला. खारघर पोलिसांकडे प्रेक्षकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रविवारी सायंकाळी 6 ते 10 वाजण्याच्या दरम्यान सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार घडले. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने एकमेकांना खेटून असलेल्या प्रेक्षकांच्या गळ्यातून अक्षरशः सोनसाखळी खेचण्यात आल्या. अशा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या गळ्यातून 10 लाख 50 हजार रूपये किमतीच्या सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत. खारघर पोलीस चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली.







