| रेवदंडा | प्रतिनिधी |
समुद्रकिनारी गार झुळुका, शेकोट्यांभोवती पर्यटक व नागरिकांची ऊबदार गर्दी. रेवदंडा, चौल व आजूबाजूच्या किनारी विभागात अखेर ‘थंडीची गोड चाहूल’ लागली आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून हळूहळू वाढत जाणारा गारवा आता ठसठशीतपणे जाणवू लागला आहे. रात्रीच्या वेळी गार वारे अंगाला चरे पाडतील इतके बोचरे होत असून, पहाटे दाट धुक्याची दुलई संपूर्ण परिसर झाकून टाकते.
समुद्र किनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे रेवदंड्यात यंदाची थंडी आणखी गारठून येत आहे. पहाट ते संध्याकाळ थंडीचा स्पष्ट प्रभाव पहाटेच्यावेळी कामावर जाणारे चाकरमानी, शालेय विद्यार्थी, दूध-वितरक, मासेमार आणि फेरफटका मारणारे नागरिक स्वेटर, कानटोपी, मफलरचा वापर करताना दिसू लागले आहेत. दिवसभर समुद्रकाठावरून येणाऱ्या गार झुळुकींमुळे वातावरण थंडगार राहते, तर दिवस ढळताच हवा अधिकच गारठते.
शेकोट्यांचा वाढता माहोल, पर्यटकही मजा लुटताना दिसत आहेत. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी ही थंडी आता शरीरात हुडहुडी भरवू लागली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये, चहाच्या टपऱ्यांपाशी तसेच अनेक घरांच्या अंगणात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यात विशेष म्हणजे रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर आलेले पर्यटकही शेकोटी भोवती बसून थंडीची ऊब घेत ‘गुलाबी थंडीचा’ आनंद घेताना दिसत आहेत. शेकोट्यांची उबदार, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड हवेच्या स्पर्शात पर्यटक जणू छोट्या ‘हिवाळी बीच पार्टी’चा अनुभव घेत आहेत. अनेकांना या थंडीमुळे हलकी हुडहुडीही लागत आहे, पण गारवा आणि उबदार वाऱ्यांचा हा अनोखा संगम पर्यटकांना अधिक रसरसून भावतो आहे.
थंडी वाढताच बाजारपेठेत चैतन्य विविध प्रकारचे उबदार कपडे, हातमोजे, मफलर, स्टायलिश हिवाळी फॅशन आयटमची लगबग वाढली आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाची थंडी उशिरा आली असली तरी विक्रीवर चांगला परिणाम दिसून येतोय. दिवाळीत न जाणवलेली थंडी आता जोरात. दरवर्षी दिवाळीच्या काळात भासणारी टिपिकल थंडी यंदा जवळपास महिनाभर उशिरा आली. मात्र, आता ती जाणवू लागली असून पहाटे व रात्रीच्या सुमारास तापमानात चांगलीच घट दिसून येते. समुद्रकाठाच्या गावांमध्ये ही थंड हवा अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याने नागरिक आणि पर्यटक दोघेही हिवाळ्याचा हा अनुभव मनसोक्त घेत आहेत. येणाऱ्या दिवसांत गारव्यात आणखी भर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेवदंडा- चौल परिसरातील ही ‘गुलाबी थंडी’ अधिकच जोमानं जाणवणार आहे. थंडीचा हा गोलाईदार, गोड अनुभव नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतोय, तर पर्यटकांनाही समुद्रकाठच्या हिवाळ्याची रोमँटिक अनुभूती मिळत आहे. थंडीने सजलेलं हे सुंदर हवामान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.







