भाजपाच्या पत्रकबाजीतून राजकारण तापले; मनसे व आघाडीचा जोरदार हल्ला
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच उर्दू भाषेत प्रचारपत्रक काढताच तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कधीही न झालेले हे उर्दू प्रचारपत्रक अचानक प्रभाग क्रमांक 4 मध्ये वाटण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपावर मुस्लीम मतांसाठी जोगवा मागण्याचा आरोप केला आहे. यामुळे निवडणूक वातावरण तापले असून, सामान्य मतदारांमध्येही चर्चेची जोरदार भडिमार सुरू आहे. उरण शहरात 2 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. प्रचार मोहीम जोमात असताना भाजपाकडून प्रभाग 4 मध्ये जिथे कोणताही मुस्लिम उमेदवार उभा नाही, तिथे उर्दू भाषेतील पत्रक वाटण्यात आले.
यापूर्वी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कधीही कोणत्याही पक्षाने उर्दू भाषेत प्रचारपत्र वाटले नव्हते. त्यामुळे भाजपाचा हा अचानक घेतलेला उर्दू वळण चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रभागांमध्ये मुस्लिम उमेदवार व समाज मोठ्या प्रमाणात आहे, तेथे मात्र असे उर्दू पत्रक वाटले गेले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये प्रश्न उठत आहेत. उर्दू पत्रक प्रभाग 4 मध्येच का? उद्देश नेमका काय? आणि कोणासाठी हा विशेष प्रयत्न? यामुळे स्थानिक मराठी मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून, उरणच्या राजकारणात भाषेचं नवं राजकारण सुरू झालं का? अशी विचारणा होत आहे. उर्दू पत्रकानंतर भाजपाने मुस्लिम समाजासाठी बोरी परिसरात जेवणावळही आयोजित केली. त्यानंतर महाविकास आघाडीनंही समांतर जेवणावळ ठेवत राजकीय तापमान आणखीनच वाढवलं.
मुस्लिम मतदारांना गोंजारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची स्पर्धा रंगली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी थेट भाजपावर निशाणा साधला. त्यांनी आमदार महेश बालदी यांना मुद्देसूद प्रश्न विचारत सांगितले हो, आम्हाला मुस्लिम मतं हवीत पण मराठीत! उरणचा मुस्लिम समाज मराठीच समजतो. उर्दू पत्रकाची इथे कधीच गरजच नव्हती. तसेच त्यांनी आणखी पुढे विचारले पत्रक खास बोरीतच का वाटले? उरणच्या बाकी मुस्लिम वस्त्या का गाळल्या? या निवडक पत्रकबाजीत नेमका कोणाचा स्वार्थ लपलाय? मनसेच्या टीकेसोबत महाविकास आघाडीनेही भाजपाला घेरलं.
माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, भाजप गेल्या 15-20 वर्षांपासून नगरपालिकेत सत्तेत आहे. आता सत्ता गळतीच्या भीतीने मुस्लिम समाजाला खुश करण्याचे प्रयोग सुरू आहेत. पण उरणकर हुशार आहेत; ते या उर्दू खेळाला बळी पडणार नाहीत. दरम्यान, भाजप आमदार महेश बालदी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिप्रश्न केला. उर्दू पत्रक काढलं तर काय बिघडलं? उर्दू ही देशातील मान्य भाषा आहे. प्रचाराला भाषा अडसर असते का? त्यांचे उत्तर आल्यावरही विरोधकांचा हल्ला शमवण्याची चिन्हे दिसत नाहीत. उरण नगरपालिका निवडणुकीला अगदी काहीच दिवस उरले असताना उर्दू पत्रकबाजीमुळे निर्माण झालेल्या या वादळाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 3 डिसेंबरचा निकालच दाखवेल उर्दू पत्रकाचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला!







