रोडपाली सिग्नल येथील घटना
। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील रोडपाली सिग्नल येथे बुधवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या भीषण अपघातामध्ये ट्रेलरच्या चाकाखाली नऊ वर्षाच्या मुलाचे डोके चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शर्विल असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता दूसरीत शिकत होता. अपघातावेळी तो आपल्या वडीलांसोबत स्कूटीवरून जात होता.
तळोजा फेज 2 येथील शुभ इनक्लेव्ह या सोसायटीत राहणारे 43 वर्षीय सुनील पाकळे हे त्यांचा मुलगा शार्विल याला घेऊन शाळेत सोडण्यासाठी स्कूटीवरून रोडपाली बाजूकडे जात होते. कासाडी नदीचा पूल ओलांडल्यानंतर ते रोडपाली सिग्नल अगोदर 30 फूट अंतरावर आले असता भरधाव वेगाने चाललेल्या ट्रेलर चालकाने स्कूटीला धडक दिली. यात स्कूटीवरून चाललेले बापलेक रस्त्यावर कोसळले. स्कूटीला धडक लागल्याचे समजूनही ट्रेलर चालकाने त्याच्याजवळील ट्रेलर न थांबवता तेथून निघून गेला. या दरम्यान ट्रेलरचे मागील चाक बालक शर्विल याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात ट्रेलरचालक राजकरण वर्मा याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे.






