परिवहन खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांमध्ये संताप
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा एस.टी. बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून प्रवाशांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे, बस येताना होणारे धक्के, बेशिस्त वाहने, अस्वच्छता आणि गुटख्याच्या दुर्गंधीने अक्षरशः प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष व परिवहन विभागाची उदासीनतेवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणामुळे रेवदंडा एसटी स्थानकात दररोज मोठी प्रवासीवदर्ळ असते. या ठिकाणी पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून निर्माण झालेली तळी आता कोरडी पडल्याने खड्ड्यांचे भयावह रूप स्पष्ट दिसत आहे. एसटी बस येताना प्रवाशांना धक्कादायक झटके बसतात. चालकांना हे खड्डे चुकविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यातच, बसस्थानक परिसरात लहानमोठी वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवली जातात, त्यामुळे स्थानकात एसटीला उभी करण्यासाठी देखील जागा मळित नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून बस चालकांना स्थानकात प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही बेशिस्त पार्किंग प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरत आहे. त्यातच बस स्थानक परिसरात अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणत वाढत आहे. गुटख्याच्या पिचकाऱ्या, थुंकलेल्या जागा आणि दुर्गंधीने हा परिसर भरून गेलेला आहे. त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला, मुले आणि वृद्धा बसस्थानकाच्या आत बसणे टाळून बाहेरच थांबणे पसंत करतात.बाराही महिने रेवदंडा परिसरात देशांतर्गत व परदेशी पर्यटक येत असतात; परंतु, बसस्थानकाची ही बिकट अवस्था रेवदंडाच्या प्रतिमेला तडा देणारी ठरत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
शासनाची संशयास्पद भूमिका
रायगड जिल्ह्यातील 90 टक्के एसटी स्थानकांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, रेवदंडा एसटी स्थानकाचे काम मागे का राहिले, हा सवाल प्रवासी वर्ग सातत्याने विचारत आहेत. परिवहन खाते आता मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे. मात्र, त्यांचे रेवदंडा बसस्थानकाडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असून शासनाची संशयास्पद भूमिका असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह परिसरातील घाण, खड्डे आणि पार्किंगचा अराजक तेची जबाबदारी कोण घेणार? रेवदंडा एसटी स्थानकाचा विकास नेमका कुठे अडला? या सर्व प्रश्नांची उत्तरे परिवहन विभागाने तातडीने द्यावीत, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.







