| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील दूर्गम डोंगराळ भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या कुडपण भाग प्राथमिक शाळेसाठी गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी सुरू केलेले आमरण उपोषण मध्यरात्रीच्या सुमारास संपुष्टात आले आहे. मात्र, ज्या गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्याविरूध्द ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता; त्यांच्याच स्वाक्षरीने शिक्षणसेवकांना कुडपण भाग प्राथमिक शाळेमध्ये रूजू होण्याचे समायोजन करण्यात आल्याचे पत्र देण्यात आल्याने पोलादपूरच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला गेली चौदा वर्षे वनवास देण्याऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्याविरूध्द कारवाई कधी होणार, असा प्रश्न तालुक्यात सर्वत्र विचारला जात आहे.
उपोषणकर्ते मंगेश चिकणे हे कुडपण भाग रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश चिकणे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराविरोधात आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कुडपणच्या ग्रामस्थांनी पोलादपूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर या आमरण उपोषणाला गुरूवारी सकाळी सुरूवातही केली. यावेळी पिंपळवाडी या शाळेतील एक शिक्षक मागील दीड वर्षापासून तूर्त कामगिरीने कुडपण भाग शाळेवर काम करत असत. तत्पूर्वी, अन्य शाळेतील शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात या शाळेवर येऊन शाळा व्यवस्थापन करीत होते. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक कारभार तात्पुरत्या शिक्षकांकडे गेला नसल्याने ग्रामस्थांनी वारंवार गटशिक्षण अधिकारी साळुंखे यांना सांगितले. मागील वर्षी बदलीने एक शिक्षक कुडपण भाग शाळेवर आदेशित होऊनही हजर झाले नाहीत. त्यांनी परस्पर गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांच्याकडून आदेश रद्द करून घेतले.
रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाद्वारे बदलीने अधिकृतरित्या प्रशांत तुळसुरकर या शिक्षकांची कुडपण भाग शाळेवर नेमणूक केली. कायमस्वरूपी शिक्षक मिळाल्याने कुडपण भाग शाळेची समस्या दूर होईल अशी आशा ग्रामस्थांना वाटली. परंतु ते शिक्षक शाळेवर हजर न होता एक ते दीड महिना मेडिकल रजेवर गेले व त्यानंतर दोन महिने होऊनही प्रशांत तुळसुरकर हे अद्याप शाळेवर हजर झालेले नाहीत, अशी तक्रार करताना ज्यादिवशी मेडीकल रजेवर गेले; त्यादिवशी ते अलिबागला शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमास उपस्थित असल्याचा फोटोही पुराव्यादाखल उपोषणकर्ते मंगेश चिकणे यांनी दाखविला.
यावेळी कुडपण भाग राजिप प्राथमिक शाळेच्यासंदर्भात आमरण उपोषणाची माहिती घेण्यास आलेले गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांना उपोषणकर्ते मंगेश चिकणे यांनी तोंडावरच विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याबद्दल जबाबदार धरून कायमस्वरूपी शिक्षक देण्यामागे काय हेतू आहे, असा जाब विचारला. यावेळी थातूरमातूर उत्तरे देत गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ करून पळ काढला. यावेळी बेजबाबदार गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्याविरूध्द कारवाई करण्याची तसेच कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी योग्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मध्यरात्री उपोषण सोडण्यासाठी उपोषणकर्ते कुडपण ग्रामस्थांना विनंती करण्यात आली तसेच शुक्रवारी शिक्षकाचे समायोजन करण्याची ग्वाही यावेळी राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे आणि गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिल्यानंतर उपोषण संपुष्टात आले. यावेळी सहगटविकास अधिकारी हंबीर, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे हेदेखील उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी कुडपण भाग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश चिकणे या उपोषणकर्त्यांना दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी उपशिक्षक उपलब्ध करून देत असल्याचे पत्र देताना दुसरीकडे मनोज रमेश हांगे आणि अस्मिता कमलेश कनोजे या दोन शिक्षणसेवकांना नियोजित वेळेत आपण समायोजनाचे ठिकाणी हजर रहावे, समायोजनास नियोजित वेळेत हजर न राहिल्यास आपणास शाळा मागण्याचा अधिकार राहणार नाही, व आपल्याला नेमणुक ज्या शाळेवर देण्यात येईल तेथे आपणास हजर व्हावे लागेल, असे तंबीवजा पत्र दिले आहे. मात्र, उपोषणकर्त्यांची मूळ मागणी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराविरोधात आमरण उपोषण करण्याची असूनसुध्दा त्याच गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांच्याच स्वाक्षरीने शिक्षकांच्या समायोजनाचे पत्र देण्यात आल्याने गेल्या चौदा वर्षांपासून पोलादपूर तालुक्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मनमानी कारभाराने वेठीस धरणाऱ्या सुभाष साळुंखे यांच्यापासून पोलादपूर तालुक्याची सुटका कधी होणार, असा सवाल रायगड जिल्हा परिषदेला पोलादपूरची जनता करीत आहे.







