। पनवेल । वार्ताहर ।
स्टील मार्केट, कळंबोली येथे पेंटिंग करीत असलेल्या तीस वर्षीय तरुणाला ट्रेलरने पाठीमागून धडक दिल्याने दोन ट्रेलरमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मनोज कुमार रामबक्स असे त्याचे नाव आहे. मनोज कुमार रामबक्स आणि मोहम्मद हे दोघे स्टील मार्केट, रोड नंबर 2 च्या पदपथालगत ट्रेलर पेंटिंग करीत होता. या ट्रेलरच्या मागे सहा फूट अंतरावर दुसरा ट्रेलर उभा होता. मनोज कुमार हा ट्रेलरच्या मागील बाजूस पेंटिंग करीत असताना मोना वेअर हाऊसकडून येणारा ट्रेलर भरधाव वेगात वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने दुसऱ्या ट्रेलरला पाठीमागून धडक मारली. तो ट्रेलर मनोज कुमार पेंटिंग करीत असलेल्या ट्रेलरला जाऊन धडकल्याने मनोज कुमार हा दोन्ही ट्रेलरमध्ये दबून गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




