| चौल | प्रतिनिधी |
चौल-भोवाळे पर्वतनिवासी दत्त मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे यांचा 65 वा वाढदिवस वार्डे गुरुजी नवनाथ मंडळ, चौलच्यावतीने मोठ्या उत्साहात गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. गेली 45 वर्षे निःस्वार्थ वृत्तीने गुरव म्हणून आगलावे दत्तगुरुंची सेवा करीत आहेत. यावेळी उपस्थित दत्तभक्तांनी मंदिरात उपस्थित राहून गुरव आगलावे यांना शुभेच्छा दिल्या.
प्रभाकर आगलावे 20 वर्षांचे असतानाच दत्तटेकडीवरील दत्तगुरुंची सेवा करण्यासाठी आले. तेव्हापासून आजतागायत ते उत्साहाने दत्तगुरुंची सेवा करीत आहेत. आगलावे यांच्या माध्यमातून दत्तमहाराजांची पहाटे पाच वाजता व सायंकाळी सहा वाजता महाआरती केली जाते. आलेल्या दत्तभक्तांचे त्यांच्याकडून सुहास्यवदनाने स्वागत केले जाते. दत्तटेकडीवर प्रभाकर आगलावे यांच्याकडून राज्यभरातून येणाऱ्या भक्तांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार सेवा दिली जाते. आपले संपूर्ण आयुष्य दत्तगुरुंच्या चरणी लीन झालेल्या आगलावे यांचा वाढदिवस दत्तगुरुंच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते प्रभाकर आगलावे यांचे औक्षण, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने दत्तभक्त उपस्थित होते. दरम्यान, गुरव प्रभाकर आगलावे यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की, दत्तगुरुंची सेवा ही माझ्यासाठी ईश्वरी आशीर्वाद असून, भक्तांचे प्रेम आणि सहकार्य मला नेहमीच प्रेरणा देते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष वासुदेव, सचिन राऊत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर, निकेश घरत, हेमंत वर्तक, राकेश नाईक, अनिकेत नाईक आणि वार्डे गुरुजी नवनाथ मंडळ, चौलचे सर्व सभासद आणि दत्तभक्तांनी मेहनत घेतली.







