। मुंबई । प्रतिनिधी ।
घाटकोपर पूर्व येथील पटेल चौकातील भानुशाली मोबाईल शॉपी या दुकानातील साडेतीन लाख रुपये किमतीचे मोबाइल पळवल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी तपास करून पंतनगर पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घाटकोपर पूर्व येथील पटेल चौकातील भानुशाली मोबाईल शॉपी या दुकानात चोरांनी 16 नोव्हेंबर रोजी दुकानाचे छपर रात्री तोडून चोरांनी आता प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी दुकानातील साडेतीन लाख रुपये किमतीचे मोबाईल घेऊन पोबारा केला होता. दुसऱ्या दिवशी दुकान मालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केल्यानंतर आरोपी एका टॅक्सीतून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून हितेश सोळंकी (41) याला पुणे येथून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता बेलापूर परिसरात राहणाऱ्या फिरोज खान (31) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली सोळंकीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी फिरोज खानलाही अटक केली. या आरोपींनी चोरलेले सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.







